Thane News : ठाण्यात इमारती कोसळण्याचा मालिका सुरूच; वागळे इस्टेटमध्ये छताचे प्लास्टर कोसळून दोघे जखमी

•शिवाजीनगरमधील साई ममता इमारतीत दुर्घटना; 11 वर्षीय मुलगा आणि युवक किरकोळ जखमी
ठाणे :- ठाण्यात जुन्या इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मुंब्रा आणि दिवा परिसरातील दुर्घटनांनंतर आता ठाण्यातील वागळे इस्टेट भागात एका इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
वागळे इस्टेट येथील शिवाजीनगरमधील सुमारे 30 वर्षे जुन्या साई ममता इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका सदनिकेतील छताचे प्लास्टर अचानक खाली कोसळले. यावेळी घरात झोपलेले वंश अनिश देवलिया (11 वय) आणि विवेक अनिश देवलिया (22 वय) यांच्या अंगावर प्लास्टर पडल्याने ते किरकोळ जखमी झाले.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वी मुंब्र्यातील दौलत नगर येथील एका इमारतीचा सज्जा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर एक महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच दिवा परिसरात एका चाळीची गॅलरी कोसळून 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. या घटनांमुळे जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



