क्राईम न्यूज

Thane News : माथाडी युनियनचा ‘पदाधिकारी’ बनून खंडणी मागणारा जेरबंद!

Thane Latest Crime News : ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई; 5 लाखांची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक

ठाणे :- माथाडी कामगार युनियनचा पदाधिकारी असल्याची बतावणी करून व्यावसायिकांकडून ‘प्रोटेक्शन मनी’ च्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या एका इसमास ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. घनश्याम सीताराम नाईक (वय 52, रा. कळंबोली, पनवेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला 5 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. Thane Latest Crime News

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे एका व्यावसायिकाने तक्रार दिली होती की, आरोपी घनश्याम नाईक याने स्वतःला माथाडी कामगार युनियनचा पदाधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर, तक्रारदार यांच्या ठाणे आणि मुंबई येथे सुरू असलेल्या कंपनीच्या साईटवर माल घेऊन येणाऱ्या प्रत्येक गाडीमागे 3 हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा साईटवरील काम बंद पाडू आणि गाड्या फिरू देणार नाही, अशी धमकी दिली. तडजोडीअंती, नाईक याने व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची जबरदस्तीने मागणी केली होती.

गंभीर तक्रारीची दखल घेत, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेण्यात आली. त्यानंतर, खंडणी स्वीकारण्यासाठी आलेल्या आरोपी घनश्याम सीताराम नाईक याला खंडणी विरोधी पथकाने दिनांक 22 जुलै रोजी फॉरच्युन लेक सिटी हॉटेल, ज्युपीटर हॉस्पिटल, ठाणे येथे सापळा रचून पाच लाख रुपये खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक केली.

आरोपीविरोधात वर्तकनगर पोलीसठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 351 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी घनश्याम सीताराम नाईक याला दिनांक 25 जुलै रोजीपर्यंत न्यायालयाकडून पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस (खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर) हे करत आहेत.

आरोपी घनश्याम सीताराम नाईक याने अशाच प्रकारे आणखीन कोणाकडून खंडणी वसूल केली आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या इसमाविरुद्ध कोणत्याही व्यावसायिकाची किंवा इतर कोणाची तक्रार असल्यास, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर, यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), ठाणे, आणि विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोथ-2, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात श्री. शैलेश साळवी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलीस हवालदार संजय राठोड, आणि पोलीस शिपाई तानाजी पाटील यांचा समावेश होता.

vivek

Recent Posts