ठाणे

Thane News : ठाण्यात ‘चरस डील’ आधीच उधळली! — रेल्वे स्टेशनसमोरील धडक कारवाईत साडेतीन किलो चरससह एक जेरबंद

•Charas Deal busted in Thane : 31 लाखांचा अंमली माल घेऊन विक्रीसाठी आलेला बिहारचा तस्कर ; गुन्हे शाखेच्या वागळे युनिटची शिताफीने कारवाई

ठाणे | मुंबईच्या उपनगरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आल्याचं एक मोठं कार्टेल उध्वस्त करत ठाण्यातल्या गुन्हे शाखेच्या वागळे युनिट-5 च्या पथकाने चरससह एक आरोपी जेरबंद केला आहे. आरोपीकडून मिळालेला माल आणि मुद्देमाल याची एकूण किंमत तब्बल 31 लाख 7 हजार 500 रुपये आहे.

30 जून रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोपरी रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल समोरील सार्वजनिक रस्त्यावर एक व्यक्ती चरस विक्रीसाठी येणार आहे. माहितीची खातरजमा होताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आलं.

पोलिसांनी ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला आणि संशयित आरोपी मोहंमद आफताब आलम मोहंमद सलीम अखतर (वय 34, रा. छपरा, बिहार) यास रंगेहाथ अटक केली. तपासात त्याच्याकडून 3.096 किलो चरस, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 31 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यातील कलम 8(क), 20(ए)(ब), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथक

डॉ. पंजाबराव उगले (अपर पोलीस आयुक्त – गुन्हे), अमरसिंह जाधव (उप आयुक्त – गुन्हे), आणि शेखर बागडे (सहाय्यक पोलीस आयुक्त – शोध 1) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, पोलीस हवालदार विजय काटकर, सुनिल निकम, संदीप शिंदे, सुशांत पालांडे, ज्ञानेश्वर जाधव, यश यादव, रघुनाथ गार्डे गुन्हे शाखा, ठाणे या पथकाने केली आहे.

vivek

Recent Posts