ठाणे

Thane News : अंबरनाथ-बदलापुरात भाजपाची मुसंडी! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ‘कमळ’ फुलले; महापालिका जागावाटपात भाजपाचा दबाव वाढणार

फडणवीस-चव्हाण रणनीती यशस्वी; नवी मुंबईत, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपाकडून ‘स्वबळा’ची चाचपणी सुरू

ठाणे/कल्याण | ठाणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असलेली पकड ढिली करत, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालांमुळे संपूर्ण जिल्ह्यात ‘शत-प्रतिशत’ भाजपचा नारा पुन्हा एकदा घुमू लागला असून, आगामी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिंदे सेनेची रणनीती अंगलट

अंबरनाथ आणि बदलापूर हे वर्षानुवर्षे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये स्वतः तळ ठोकला होता, तर बदलापुरात वामन म्हात्रे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन भाजप आमदार किसन कथोरे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपवर दबाव वाढवण्यासाठी ही खेळी खेळली गेली होती, मात्र मतदारांनी भाजपला कौल दिल्याने आता शिंदे गटाला भाजपसमोर नरमाईची भूमिका घ्यावी लागणार आहे.

फडणवीस आणि चव्हाणांचा करिष्मा
या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे.

बदलापूर: फडणवीसांनी येथे सभा घेऊन ‘विकास अजेंडा’ मांडला, ज्याला मतदारांनी प्रतिसाद दिला.

अंबरनाथ: अत्यंत अटीतटीच्या लढतीत फडणवीसांनी ‘भयमुक्त शहर’ असा नारा दिला होता. शिंदे पिता-पुत्रांचा प्रभाव असूनही येथे भाजपने विजय खेचून आणला, जो रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात आहे.

vivek

Recent Posts