ठाणे

Thane News : ठाण्यातील उपवनघाटावर ५१ फूट उंच विठ्ठल मूर्तीचे अनावरण; आनंद दिघेंच्या आठवणीत एकनाथ शिंदेंची भावनिक साद

•’मी कॉमन मॅन आहे, वारकरी भक्त म्हणून येथे आलो’; गोमातेला ‘राज्य मातेचा’ दर्जा मिळाल्याचा केला उल्लेख

:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी ठाण्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे 51 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचे अनावरण मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्याला हजारो भाविकांनी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’चा जयघोष करत हजेरी लावली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपले राजकीय गुरू आणि दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

आनंद दिघे यांनीच दिली शिकवण

उपवनघाटावर आयोजित या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे. तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला.” वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना त्यांनी आपले गुरू आनंद दिघे यांची आठवण सांगितली. “हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने वाईट विचार जातात, अशी शिकवण आम्हाला आनंद दिघे यांनी दिली,” असे शिंदे म्हणाले.

ठाणेकरांना भाग्यवान मानले

कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित या सोहळ्यात शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. पांडुरंगाची 51 फूट उंच अशी भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत,” असे ते म्हणाले. हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला आहे, तसेच मिरा-भाईंदर येथे 2 आणि कासारवडवली येथे 1 अशा आणखी चार विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकाभिमुख निर्णयांचा उल्लेख

स्वतः वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आल्याचे सांगत शिंदे म्हणाले, “आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो.” त्यांनी महायुती सरकारच्या निर्णयांचा उल्लेख केला:

मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ बंद होणार नाही.

गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी मला ‘काऊ मॅन’ ही पदवी दिली, जो माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे.

वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा आणि शौचालये उपलब्ध केली आहेत.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0