Thane Murder News : खुनाच्या गूढ प्रकरणाचा 24 तासांत छडा! प्रेयसीची हत्या करून ट्रॉली बॅगेत मृतदेह खाडीत फेकणारा प्रियकर जेरबंद!

Thane Latest Murder News : लिव्ह-इन पार्टनरनेच घेतला 22 वर्षीय तरुणीचा जीव; शिळ-डायघर पोलिसांच्या तत्परतेमुळे माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा उघड!
ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील देसाई खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ शिळ-डायघर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उकलून काढले आहे. दारुण भांडणातून लिव्ह-इन पार्टनरनेच गळा दाबून प्रेयसीचा खून केल्याची आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बॅगेत भरून खाडीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Thane Latest Crime News
दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास देसाई खाडी पुलाखालील मातीच्या भरावावर एक ट्रॉली बॅग पडलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता, बॅगेमध्ये 20 ते 25 वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह गुडघ्यात दुमडून भरलेला दिसला. मयत महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ ‘P.V.S.’ असे गोंदलेले असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पौळ यांनी चार तपास पथके तयार करून युद्धपातळीवर तपास सुरू केला. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातमीद्वारे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (वय 50, रा. देसाई गाव) या आरोपीला देसाई येथून ताब्यात घेतले. Thane Latest Murder News
आरोपी विनोद विश्वकर्मा याच्याकडे कसून तपास केला असता, त्यानेच खून केल्याची कबुली दिली. मृत महिला प्रियांका विश्वकर्मा (वय 22) ही गेल्या 2 वर्षांपासून आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री दोघांमध्ये जोरदार भांडण झाले, आणि याच भांडणातून आरोपीने प्रियंकाचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून त्याने तो एक दिवस खोलीतच ठेवला. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यानंतर 22 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा ते बारा वाजताच्या दरम्यान आरोपीने ती ट्रॉली बॅग पायी चालत खाडी पुलाकडे नेली आणि पुलावरून खाली फेकून दिली.
मयत आणि आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतानाही, शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कसोशीने तपास करून मृतदेहाची ओळख पटवली आणि आरोपीला 24 तासांत अटक करून खुनाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणला. पोलीस उप आयुक्त सुभाषचंद्र बुरसे आणि प्रशांत कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्तुत्य कामगिरी पार पडली.


