Thane Murder News : “खून ठरवला… वार केले… आणि पसार झाले! पण ठाणे पोलिसांच्या तावडीतून वाचले नाहीत!”

Thane Latest Murder News : 40 वर्षीय महिलेला निर्घृणपणे ठार मारून बिहारपर्यंत पलायन; ठाणे पोलिसांची तीन टीम्स, 100 CCTV आणि 72 तासात थरारक अटक!
कळवा | कळवा पूर्वेतील सम्राटनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 40 वर्षीय शांताबाई सुरेश चव्हाण यांचा 14 जून 2025 रोजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला होता. धारदार शस्त्राने गळा, छाती आणि पोटावर गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना कळवा पोलीस ठाण्याच्या Thane Kalwa Police News हद्दीत कावेरी सेतू रोडलगत सुरू असलेल्या नव्या इमारतीत घडली. याप्रकरणी त्यांचे पती सुरेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात भा.दं.सं. 2023 चे कलम 103(1), 238 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. Thane Latest Crime News
कळवा ते खगडिया: पोलिसांचा अचूक सापळा, तीन ठिकाणी एकाच वेळी रेड, आरोपी जेरबंद!
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी विशेष तपास सुरू केला. कळवा पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा घटक 01 आणि मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष अशा तीन स्वतंत्र टिम तयार करून समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान 90 ते 100 सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. कळवा ते कुर्ला रेल्वे स्टेशन या मार्गावरील हालचालींच्या तांत्रिक विश्लेषणातून तिघा संशयितांचा ठावठिकाणा स्पष्ट झाला. स्थानिक रिक्षाचालक, हॉटेल चालक यांच्या चौकशीदरम्यान तीन आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला.
पोलीस तपासात निष्पन्न झाले की, खून केल्यानंतर आरोपी लगेचच परराज्यात, म्हणजेच बिहार राज्यातील खगडिया जिल्ह्यात पसार झाले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 17 जून रोजी ठाण्याच्या तिन्ही पथकांनी बिहारमध्ये धाडसत्र सुरू केले. संशयित तिघे वेगवेगळ्या भागात लपल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी एकाच वेळी तीन सापळे रचण्यात आले.
या कारवाईत कळवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे, पोलीस हवालदार निखिल जाधव, राहुल पवार, पोलीस नाईक चंद्रभान शिंदे यांनी विश्वजीत राजेंद्रप्रसाद सिंग (30, रा. खगडिया, बिहार) यास अटक केली. गुन्हे शाखा घटक-01 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई सागर सुरळकर यांनी देवराज मदन कुमार (19, रा. खगडिया, बिहार) यास अटक केली. तर मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील, पोलीस नाईक दिनकर सावंत, पोलीस शिपाई रोहन म्हात्रे यांनी विधीसंघर्षित बालक (वय 17 वर्षे 3 महिने) याला ताब्यात घेतले.
अटक आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघा प्रौढ आरोपींना 1 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, बालकाला भिवंडी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
केवळ 72 तासांत ठाणे पोलिसांच्या तीन टिमांनी समन्वय साधत तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांच्या चौकशा आणि अचूक नियोजनाच्या जोरावर केलेली ही कारवाई उल्लेखनीय ठरली आहे. शांताबाई चव्हाण यांच्या हत्येच्या घटनेने ठाणे परिसरात खळबळ उडवली होती. मात्र ठाणे पोलिसांच्या जलद व कौशल्यपूर्ण कारवाईमुळे आरोपींचा बिमोड झाला असून, या तपास कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.



