कोल्हापूर

Kolhapur Fake Currency News : कोल्हापूर पोलीस दलातील ‘मास्टरमाईंड’: बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश

मिरजेत 1 कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; हवालदार इब्रार इनामदारसह पाच जणांना अटक

कोल्हापूर :- कोल्हापूर आणि मुंबईसह राज्यभर बनावट नोटांचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा सांगली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे या टोळीचा मुख्य सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार इब्रार आदम इनामदार (वय 44) आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, ही टोळी 500 आणि 200 रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा तयार करून त्या व्यवहारासाठी खपवत आहे. मिरजेत व्यवहारासाठी आलेल्या एका संशयित व्यक्तीला पकडल्यानंतर संपूर्ण रॅकेटची माहिती समोर आली. या रॅकेटचे नेतृत्व पोलीस हवालदार इब्रार इनामदार करत होता. इनामदारने कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीतील ऑफिसमध्ये लॅपटॉप, स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीने बनावट नोटा तयार करण्याची फॅक्टरी सुरू केली होती.
एका कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस वेवरील निलजी बामणी परिसरात सापळा रचून सुप्रीत देसाई याला सुरुवातीला पकडले. त्याच्याकडून 42 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्याच्या चौकशीतून इनामदारचे नाव समोर आले.

पोलिसांनी इनामदारसह राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि मुंबईतील सिद्धेश म्हात्रे यांनाही अटक केली.
या टोळीकडून 19,687 बनावट 500 रुपयांच्या नोटा आणि 429 बनावट 200 रुपयांच्या नोटा असा एकूण 1 कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात बनावट नोटांसह इनोव्हा कार, प्रिंटर आणि स्कॅनरचाही समावेश आहे.

पोलीस विभागात खळबळ

सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी तयार करत असलेल्या नोटांचा दर्जा अत्यंत उच्च असल्यामुळे त्या खऱ्या नोटांसारख्याच दिसत होत्या. इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असल्याने, या घटनेमुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीचे जाळे राज्यभरातील कोणत्या गुन्हेगारी नेटवर्कशी जोडलेले आहे, या दृष्टीने मुंबई आणि कोल्हापूर पोलिसांचे संयुक्त पथक पुढील तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0