ठाणे

Thane Crime News : ‘मास्टर की’ने ठाणे शहर गाजवणारा अट्टल चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात! करण आढाव याला अटक, 7 गुन्हे उघड

•सीसीटीव्हीच्या जाळ्याने पोलिसांचा थरारक पाठलाग यशस्वी; 2.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे :- ‘मास्टर की’ वापरून रिक्षा आणि मोटरसायकल चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला ठाणे पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या एकाच आरोपीच्या अटकेने मागील 9 महिन्यांतील तब्बल 7 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, 2 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही थरारक कारवाई 12 सप्टेंबर 2025 रोजी कळवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका रिक्षा चोरीच्या गुन्ह्यानंतर सुरू झाली. गुन्हे शाखा, घटक-1 चे सहायक पोलीस उपनिरीक्षक दयानांद नाईक आणि पोलीस हवालदार संदीप महाडीक यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. ठाणे शहरातील माजिवडा, घोडबंदर रोड येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा नेमका पत्ता शोधून काढण्यात आला.

अखेर 15 सप्टेंबर 2025 रोजी पोलिसांनी करण बाळू आढाव (वय 24) या अट्टल चोराला अटक केली. पोलीस निरीक्षक विजय मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे यांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. त्याने ‘मास्टर की’च्या मदतीने 2 रिक्षा आणि 5 मोटरसायकलींची चोरी केल्याचे कबूल केले.

ठाणे पोलीस आयुक्तलयातील कळवा, नौपाडा, राबोडी आणि गणेशपुरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याने हे गुन्हे केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली.

vivek

Recent Posts