
Thane Crime Branch Latest News : शिळ-डायघर परिसरात रचला सापळा; 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोठ्या गुन्ह्याचा कट उधळला?
ठाणे | ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-1 Thane Crime Branch Unit 1 च्या पथकाने शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी करणाऱ्या एका इसमाला रंगेहाथ पकडले आहे. पनवेल-मुंब्रा रोडवरील साई गॅरेजजवळ ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीकडून 02 देशी बनावटीचे पिस्तुल आणि 04 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा घटक-1 चे पोलीस हवालदार धनंजय आहेर यांना एका संशयित इसमाबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोटेघर समोर असलेल्या पनवेल-मुंब्रा महामार्गावर सापळा रचला. यावेळी तिथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या सद्दाम मिलन शेख (वय 34, रा. मुंब्रा) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडे ही अग्निशस्त्रे आढळली.
गुन्हा दाखल आणि पोलीस कोठडी
आरोपी सद्दाम शेख विरुद्ध शिळ-डायघर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 13 जानेवारी 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा इसम ही शस्त्रे कोणाला विकणार होता किंवा यामागे कोणता मोठा कट होता, याचा तपास आता पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ करत आहेत.
पोलिस पथकाचे कौतुक
ही कामगिरी ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने फत्ते केली.



