Goregaon Nesco Garba Fight : ‘गोरेगाव नेस्कोत गरबा नाही, राडा!’; धक्क्यावरून 19 वर्षीय तरुणावर हल्ला; खासदार रवींद्र वायकर मुख्यमंत्री-पोलीस आयुक्तांना भेटणार

•दांडिया कार्यक्रमात धक्का लागल्यामुळे दोन गटात मारामारी; 19 वर्षीय विद्यार्थ्यावर तिघांच्या टोळीचा जीवघेणा हल्ला
मुंबई :- मुंबईत नवरात्र आणि दांडियाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये गरबा खेळताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात मोठा राडा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या भांडणात एका 19 वर्षीय विद्यार्थ्यावर तीन जणांच्या टोळीने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिवसेना खासदार रवींद्र वायकर प्रचंड आक्रमक झाले असून, त्यांनी थेट नेस्को सेंटरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
धक्क्यामुळे झाला जीवघेणा हल्ला
गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये दांडिया कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत गरबा खेळताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद सुरू झाला, जो थेट मारामारीत रूपांतरित झाला. यावेळी तीन जणांच्या टोळीने एका 19 वर्षीय विद्यार्थ्यावर हल्ला केला.
खासदार वायकर आक्रमक
या धक्कादायक घटनेनंतर खासदार रवींद्र वायकर यांनी नेस्को सेंटरच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते लवकरच मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन नेस्को सेंटर विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
वायकर यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले
‘सार्वजनिक त्रासाचे केंद्र’: “माझ्या मतदारसंघात 260 ठिकाणी दांडिया गरबा सुरू आहे, पण नेस्को सेंटरमध्ये जे काही कार्यक्रम होतात, त्याचा आम पब्लिकला खूप मोठा त्रास होतो.”
वाहतूक कोंडीचा बडगा: नेस्को सेंटरमधील कार्यक्रमांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) वर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांना मागणी: गरबा खेळत असताना जर कोणी मारामारी करत असेल, तर पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा गुन्हेगारांना अटक केली पाहिजे, अशी मागणीही वायकर यांनी केली आहे.गरबा उत्सवाच्या पवित्र वातावरणात अशी हिंसक घटना घडणे अत्यंत धक्कादायक असून, यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


