Thane Crime News : ठाण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह! ‘चायनीज वेळेत दिले नाही’ म्हणून टोळक्याने तलवार उपसून हातगाडी फोडली

•मनोरुग्णालयाजवळची घटना; एका व्यक्तीवर तलवारीने वार, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे :- गेल्या काही वर्षांपासून पुणे, नागपूरसह ठाणे शहरातील गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, आता क्षुल्लक कारणावरून थेट तलवार उपसल्याचा आणि हातगाडी फोडल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. ‘चायनीज वेळेत दिले नाही’ या किरकोळ कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात तलवार घेऊन वागळे इस्टेट परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वागळे इस्टेटमधील घटना
हा प्रकार ठाण्यातील मनोरुग्णालयाजवळील चौकात, 23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडला. तक्रारदार यांचे मनोरुग्णालयाजवळील चौकात हातगाडीवर चायनीज पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. दोन व्यक्ती चायनीज खाण्यासाठी हातगाडीवर गेले आणि त्यांनी चायनीज वेळेत का दिले नाही म्हणून कामगारांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. लोकांनी त्यांना तेथून हाकलवून दिले.
तलवारीने तोडफोड आणि हल्ला
काही वेळाने ते दोघे त्यांच्या आणखी दोन साथीदारांना घेऊन तिथे आले. कामगारांनी तात्काळ तक्रारदाराला याबाबत माहिती दिली. तक्रारदार त्यांच्या दोन मित्रांसह हातगाडीजवळ आले असता, हल्लेखोरांनी कामगारांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केलेली दिसली. या टोळक्यापैकी एकाच्या हातात तलवार होती. त्याने तलवारीने हातगाडीची तोडफोड करत शिवीगाळ केली. त्याचवेळी त्याने तक्रारदार यांच्या एका मित्राच्या पायावर तलवारीने वार केला. नागरिकांना धमकावल्यामुळे लोक पळून गेले आणि त्यानंतर चौघांनी मिळून तक्रारदाराची हातगाडी उलटविली.
या घटनेनंतर भीतीपोटी तक्रारदार आणि त्यांचे मित्र यांनी तात्काळ तक्रार दिली नव्हती. अखेर 5 नोव्हेंबर रोजी त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांनुसार पाच ते सहा जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यात दिवसागणिक अशा प्रकारे क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या गुंडगिरीमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



