Thane Crime News : हरियाणा-दिल्लीतून अवैध स्कॉच मद्याचा 18 लाखांचा साठा सापडला; तीन जणांना पोलिसांनी पकडलं

•उल्हासनगर, अंबरनाथमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मोठ्या कारवाईत 352 बाटल्या जप्त
ठाणे (उल्हासनगर) :- हरियाणा आणि दिल्लीतून अवैध पद्धतीने राज्यात आणल्या जाणाऱ्या उच्च प्रतीच्या स्कॉच मद्याचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे धाडाधडी करत 352 सीलबंद बाटल्या, दोन महागडे वाहन आणि 18 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर शहरातील डायमंड हॉलीडेज येथील दुकान क्रमांक 47 येथे बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकली. या ठिकाणी अरुणकुमार रामचंद्र पोपटानी यांच्या ताब्यातून अवैधरित्या आणलेला स्कॉच मद्याचा मोठा साठा सापडला. पोपटानींकडून आणखी एका ठिकाणाचा पत्ता मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने लगेचच मधुबन चौकाजवळील मनवानी मॅन्शनच्या पंपहाऊसवर दुसरी धाड टाकली. येथे सुरज श्रीकौशल शुक्ला यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात अवैध मद्याचा साठा जप्त झाला.
त्यानंतर अंबरनाथ येथील अक्षय लॉजजवळील एका पक्क्या घरात तिसरी धाड टाकली गेली, जिथे दीपक राजकुमार नंनकानी यांच्या ताब्यातून स्कॉच मद्याचा मोठा साठा सापडला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक दिपक परब यांच्या नेतृत्वाखाली या तीन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या मद्याची किंमत 18 लाखांहून अधिक असून, पुढील तपास सुरू आहे.



