Thane Crime News : चक्क रेल्वेमध्येच नोकरी लावून देतो, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक, मोहित डिसोझा.. करण अरोरा.. करण जाधव.. नाव बदलणाऱ्या सप्तरंगी ठगास गुन्हे शाखा घटक-1 कडून अटक
•Railway Fraud Jobs रेल्वे मध्ये नोकरीचं आश्वासन देऊन त्यांना ऑफर लेटरही द्यायचा, पैसे घेऊन वन टू का फोर….
ठाणे :- ऑनलाइन जॉब्स, पैसे गुंतवून दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केलेली फसवणूक , अशा अनेक प्रकारांना सध्या लोकं बळी पडत आहेत. नोकरीसाठी सध्या अनेक तरूण मुलं मुली भटकत असतात. चांगले शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. बऱ्याच लोकांना नोकरीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात.सुशिक्षित पण बेरोजगार असलेल्या तरूणांना हेरून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच ठाणे गुन्हे शाखा कक्ष-1 यांनी उघडकीस आला आहे. रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून, कधी मोहित डिसोझा, कधी करण अरोरा, तर कधी करण जाधव नाव बदलणाऱ्या सप्तरंगी ठगास ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. चक्क रेल्वेचे ऑफर लेटर देऊन सुशिक्षित बेरोजगारांकडून पैसे घेऊन वन टू का फोर होणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ठाणे नगर पोलीस ठाणे येथे 27 जुलै रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 319(2),318(4),336(2),336(3),340(2),316(2) प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हयाचा समांतर गुन्हे शाखा कक्ष-1 हे सुद्धा करत होते. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार, बेरोजगार तरुणांना नोकरीची आमिष देऊन त्यांची फसवणूक करणारा संशयित आरोपी मोहित डिसोझा हा ठाणे स्टेशन येथे तरुणांकडून पैसे स्वीकारण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कौशल्यपूर्वक मोठ्या शिताफीने डिसोझा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी आपले खरे नाव ललित शिवनाथ शक्ती (24 वर्ष) (रा. आंबेडकर नगर खेमानी रोड श्रीराम चौक उल्हासनगर-2) असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याबाबत कबुली दिली आहे.
बेरोजगार तरुणाची करायचा फसवणूक?
ललित शिवनाथ शक्ती हा आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंट च्या माध्यमातून भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांच्या जाहिराती देऊन त्यावर त्याचे नाव मोहित डिसोझा, करण अरोरा, करण जाधव अशा नावांचा वापर करायचा. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल नंबर चा वापर करून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला संपर्क साधून त्यांच्याकडील कागदपत्रे तसेच रोख रक्कम स्वतःकडे घेऊन ठेवायचा. बनावट भारतीय रेल्वे विभागाचे काही फॉर्म तयार करून ते फॉर्म भरून घेतल्यानंतर रेल्वे मंत्रालयाच्या नावाने बनावट ऑफर लेटर देऊन त्यांच्याकडून पैसे स्वीकारायचा. त्यानंतर मोबाईल फोन बंद ठेवायचा. आरोपीने आत्तापर्यंत ठाणे, पालघर या जिल्ह्यातील चौदा सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये कबूल केले आहे. त्यांनी आत्तापर्यंत 13 लाख 95 हजार रुपयाचे तरुणांकडून उकलन केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरी झडती घेतल्या असता नोकरीला लावून देणाऱ्या अनेक तरुणांचे कागदपत्र पोलिसांना सापडले आहे. संपूर्ण घटनेचा पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून यामागे कोणते मोठे रॅकेट आहे का याचा पोलीस तपास करत आहे.
पोलीस पथक
अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध-१) गुन्हे, शेखर बागडे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ, पोलीस उप निरीक्षक आनंदा भिलारे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय फराटे, नरसिंह महापुरे, भरत आखांदेकर, पोलीस हवालदार सुनिल माने, अविनाश पाटील, प्रशांत निकुंभ, पोलीस नाईक गणेश बडगुजर व पथकाने केली आहे.