पुणे पोर्शे अपघात प्रकरण: 18 महिन्यांनंतर तिन्ही प्रमुख आरोपींना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Porsche Case : पालकांनी मुलांना पैसे अन् चाव्या देण्यापेक्षा वेळ द्यावा’; जामीन मंजूर करताना न्यायालयाचे परखड ताशेरे
पुणे | पुण्यातील कल्याणीनगर येथील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रक्ताचे नमुने बदलल्याचा (Blood Sample Swapping) गंभीर आरोप असलेल्या तीन प्रमुख आरोपींना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. सुमारे 18 महिने तुरुंगात राहिल्यानंतर या तिघांची आता कारागृहातून सुटका होणार आहे.
न्यायालयाने कोणाला दिला जामीन?
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील खालील तिघांना जामीन दिला आहे.
1.आदित्य अविनाश सूद: कारमध्ये मागे बसलेल्या मुलाचे वडील.
2.आशिष सतीश मित्तल: मुख्य आरोपीच्या वडिलांचा मित्र.
3.अमर संतोष गायकवाड: रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच घेणारा कथित मध्यस्थ.
‘पालकांकडे मुलांसाठी वेळ नाही’; कोर्टाची गंभीर टिप्पणी
जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने पालकांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, “मुलांना चैनीसाठी अमाप पैसे आणि महागड्या गाड्यांच्या चाव्या देणे पूर्णतः चुकीचे आहे. आजच्या काळात पालकांकडे मुलांसाठी वेळ नसतो आणि ते त्याची भरपाई पैशांच्या स्वरूपात करतात, हे सामाजिक वास्तव चिंताजनक आहे.” आरोपी 18 महिन्यांपासून कोठडीत असून शिक्षेचे स्वरूप पाहता त्यांना अधिक काळ तुरुंगात ठेवणे अन्यायकारक ठरेल, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
नेमके प्रकरण काय होते?
19 मे 2024 रोजी रात्री पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन बिल्डर पुत्राने मद्यधुंद अवस्थेत सुसाट पोर्शे कार चालवत अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुण आयटी इंजिनीअर्सना चिरडले होते. या अपघातानंतर मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली वरील तिघांना अटक करण्यात आली होती.



