Thane Crime News : ‘नाल्यांवर इमले’, ठाण्यात भूमाफियांचा नवा बिनधास्त पॅटर्न!

Thane Latest illegal Construction News : न्यायालयाचे आदेश झुगारून, नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ
ठाणे – ठाणे शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या अनधिकृत इमारतींचा विळखा आता अधिकच धोकादायक बनला आहे. न्यायालयीन आदेश, वनविभागाची हद्द, महापालिकेचे नियम – हे सगळं भूमाफियांसाठी केवळ कागदोपत्रीच राहिलं आहे. कारण आज नाल्याच्या भिंतीला खेटून उभ्या राहत आहेत आठ-आठ मजली इमारती, त्या देखील काही महिन्यांपूर्वीच कारवाई झालेल्या जमिनीवर! Thane Latest illegal Construction News
सावरकरनगर, महात्मा फुले नगर, लोकमान्यनगरसारख्या घनदाट भागांत नाल्यालगत, मुख्य रस्त्याच्या तोंडावरच हे टोलेजंग बिनधास्त इमले उभे राहत आहेत. कोरस रोडवरील आईमाता मंदिरासमोर तर नाल्याच्या कडेवरच चार मजले उभे राहिल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
कारवाईनंतरही पुन्हा उभे राहिले इमले; नाल्यालगत 8 मजली इमारत
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सावरकरनगर येथील सात मजली इमारत पाडण्यात आली होती. मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्याच ठिकाणी परत बांधकाम सुरू झालं आहे. ही कारवाई केवळ दिखावा होती की प्रशासन भूमाफियांच्या दबावाखाली माघार घेतंय, असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
‘निकृष्ट स्लॅब’, ‘फास्ट ट्रॅक टॉवर्स’ आणि नागरिकांचे प्राण?
महात्मा फुले नगर परिसरात कारवाई झालेल्या जागेवर अवघ्या सात महिन्यांत आठ मजली इमारत पुन्हा उभारण्यात आली. यामुळे ‘ठाणे पॅटर्न’ म्हणून ओळख निर्माण होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची साखळी अधिकच गंभीर झाली आहे.
उल्हासनगरमधील ९०च्या दशकातील दुर्घटना अद्यापही स्मरणात आहे, जिथे हातोडा मारून फोडलेले स्लॅब भूमाफियांनी परत निकृष्ट दर्जाने जोडले आणि त्यात नागरिकांचा बळी गेला. आता ठाण्यातही तसाच इतिहास पुन्हा लिहिला जात आहे. स्लॅबवर स्लॅब चढवत निकृष्ट बांधकाम सुरू आहे आणि या ‘फास्ट ट्रॅक टॉवर्स’ नागरिकांच्या जिवाला धोका ठरू शकतात.
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यावर म्हणाले, “अनधिकृत इमारतींवर कसूर न करता कारवाई केली जाईल. दोषींवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल.”
येऊर वन परीक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनीही कबूल केले की, “वन विभागाच्या हद्दीत उर्वरित अनधिकृत बांधकामावर लवकरच कारवाई होणार आहे.”
शहर नियोजन नियमानुसार, नाल्यालगतच्या कोणत्याही बांधकामासाठी किमान सहा मीटरचे अंतर राखणे बंधनकारक आहे. मात्र ठाणे शहरात हे नियम धाब्यावर बसवले जात असून बांधकामे थेट नाल्याच्या भिंतीला लागून सुरू आहेत.
दिवा, मुंब्रा, कळवा, वर्तकनगर, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये अशा धोकादायक इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या परवानगीविना उभ्या राहणाऱ्या या इमारती नागरिकांच्या सुरक्षेला आव्हान देत आहेत.


