Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी मंडप शुल्क माफ, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकांचा मोठा निर्णय!

•खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश; मंडळांवरील आर्थिक भार कमी होणार, समाजोपयोगी कार्यांना प्रोत्साहन
ठाणे :- गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील स्थानिक प्रशासनाने यावर्षी मंडळांकडून आकारले जाणारे मंडप शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मंडळांवरील आर्थिक भार कमी होणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून सार्वजनिक उत्सव मंडळांकडून मंडप शुल्क रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. यावर लक्ष वेधून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेला पत्र दिले होते. या पत्राची दखल घेत स्थानिक प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
मंडळांवरील आर्थिक ओझे कमी
सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे केवळ धार्मिक उत्सव नसून, ते सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहेत. या काळात अनेक मंडळे रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवतात. परंतु, मंडप शुल्कामुळे मंडळांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत होता, ज्यामुळे समाजोपयोगी कामांसाठी उपलब्ध निधी कमी होत होता.
यावर्षी शुल्क माफ झाल्यामुळे मंडळांकडे आता समाजोपयोगी उपक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, कोपर, दिवा तसेच उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील हजारो उत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.


