Thane Crime News : ‘चरस’ तस्करीचा पर्दाफाश; ठाण्यात 3.40 कोटींचे ड्रग्ज जप्त

•आंतरराज्यीय तस्कर पोलिसांच्या जाळ्यात, ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी
ठाणे :- ठाण्यात अंमली पदार्थ विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) तब्बल 3 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 3 किलो 390 ग्रॅम ‘चरस’ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एका आंतरराज्यीय तस्कराला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी ड्रग्जच्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने उथळसर नाका परिसरात सापळा रचला.
या सापळ्यात मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद (वय 42, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे 3 किलो 390 ग्रॅम चरस आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 3.39 कोटी रुपये आहे. आरोपीकडून चरससह रोख रक्कम आणि इतर वस्तू असा एकूण 3 कोटी 39 लाख 7 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हा आरोपी प्रयागराजमधून ठाण्यात चरसची विक्री करण्यासाठी आला होता. या तस्करीमागे आणखी कोणकोण सहभागी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम यांच्यासह संपूर्ण पथकाने केली आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांविषयी कोणतीही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



