Pune News : पुणे राष्ट्रवादीत भूकंप! प्रशांत जगतापांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा; अजितदादांच्या गटाशी युतीला केला होता कडाडून विरोध

Pune Political News : ‘तुतारी’ सोडून ‘हात’ धरणार? जगतापांच्या राजीनाम्यामुळे हडपसरसह पुणे शहरात शरद पवार गटासमोर मोठे आव्हान
पुणे | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप Prashant Jagtapयांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, ज्याला जगताप यांनी सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला होता. “जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, तर मी पक्षात राहणार नाही,” अशी गर्जना त्यांनी यापूर्वीच केली होती.
राजीनाम्यामागची प्रमुख कारणे
1.युतीला विरोध: पुण्यात अजित पवार गटासोबत युती करण्यास प्रशांत जगताप यांचा सक्त विरोध होता. सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
2.समितीमधून वगळले: महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या समन्वय समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला, मात्र शहराध्यक्ष असूनही जगतापांना या प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आले.
3.कार्यकर्त्यांची नाराजी: हडपसर विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झाल्यानंतर जगताप यांनी महापालिकेसाठी जोरदार तयारी केली होती, मात्र पक्षपातळीवर डावलले गेल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती.
पुढील वाटचाल काय?
प्रशांत जगताप हे पुण्यातील हडपसर भागातील प्रभावी नेते मानले जातात. विधानसभेत त्यांनी 1 लाख 27 हजारांहून अधिक मते मिळवून अजित पवार गटाच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली होती. आता राजीनाम्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. जर जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर हडपसर आणि पुणे महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाला मोठी किंमत मोजावी लागू शकते.



