ठाणे

Thane Crime News : संशयाचे जाळे अन् रक्ताचा सडा! पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून वेटरची हत्या; शिळ-डायघर पोलिसांनी 4 तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या

•दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात नेले आणि डोक्यात हातोडा घालून संपवले; सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी लावला छडा

ठाणे, शिळ-डायघर :- पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयाने एका तरुणाचा क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपी पतीला शिळ-डायघर पोलिसांनी अवघ्या 4 तासांत अटक केली आहे. नवी मुंबईतील एका कॅन्टीनमध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या प्रकाश बिसा (40 वय) यांची लोखंडी हातोड्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी आरोपी रामराव दासू जाधव (39 वय) याला बेड्या ठोकल्या आहेत.

8 मार्च ते 10 मार्च 2026 दरम्यान ही घटना डायघर येथील पिंपरी गावातील एका भात शेतात घडली होती. प्रकाश बिसा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळल्यानंतर हॉटेल मालक जितेंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून शिळ-डायघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी तात्काळ दोन विशेष तपास पथके तयार केली.

असा लागला छडा

तपासादरम्यान पोलिसांनी गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेतली. संशयाची सुई रामराव जाधव याच्याकडे वळल्यानंतर पोलिसांनी त्याला शिळगाव येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या पत्नीचे मृत प्रकाश बिसा यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा त्याला दाट संशय होता. याच रागातून त्याने प्रकाशला संपवण्याचा कट रचला.

हातोड्याने केला वार

आरोपीने प्रकाशला दारू पिण्यासाठी जाऊया असे सांगून पिंपरी गावातील निर्जन भात शेतात नेले. तिथे प्रकाश पूर्णपणे गाफील असताना रामरावने आपल्यासोबत आणलेल्या लोखंडी हातोड्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या गंभीर दुखापतीमुळे प्रकाश बिसा यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.

या पथकाने केली कामगिरी

ठाण्याचे पोलीस उप-आयुक्त सुभाषचंद्र बुरसे आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक गजेंद्र राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खरात, अनिल राजपूत, योगेश लामखडे, शहाजी शेळके आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता. 4 तासांत खुनासारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0