ठाणे

Thane Bribe News : “ड्युटी मिळवायची तर पैसे द्यावे लागतात!” — ठाण्यात सुरक्षारक्षक सुपरवायझर लाच घेताना रंगेहात अटकेत

•सुरक्षा रक्षकांना शाळेत शिफ्ट लावण्यासाठी मागितले जात होते पैसे

ठाणे | सरकारी यंत्रणेत ड्युटी मिळवण्यासाठीही पैसे मोजावे लागतात हे ऐकून धक्का बसेल, पण हीच वास्तवाची झलक ठाण्यात उघड झाली आहे. सुरक्षा रक्षक मंडळात नियुक्त केलेल्या सुपरवायझरने सुरक्षारक्षकांची ड्युटी लावण्यासाठी महिन्याला पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, ठाणे अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (ACB) ही लाचखोरी सपाटून उघडकीस आणली आहे.

काय आहे प्रकरण?

शांताराम महादेव धनगर, हे बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर सुरक्षारक्षकांची शाळांमध्ये ड्युटी लावण्याचे कामकाज सोपवण्यात आले होते. या जबाबदारीचा गैरफायदा घेत धनगर हे दरमहा 500 रुपये लाचेची मागणी करीत होते.

तक्रारदार सुरक्षा रक्षकाच्या म्हणण्यानुसार, पेडरमधील शाळा क्रमांक 65 मध्ये पहाटेची ड्युटी मिळवण्यासाठी मागील तीन महिन्यांपासून एकूण 1500 रुपयांची मागणी करण्यात आली होती. हे पैसे न दिल्यास ड्युटी नाकारण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली जात होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने 20 जून 2025 रोजी ACB ठाणे विभागाने पडताळणी केली. त्या वेळी धनगर यांनी 1000 रुपये लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर 23 जून रोजी, ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 44 येथे सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 1000 रुपये घेताना शांताराम धनगर यांना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या ठाणे विभागाकडून सुरू आहे.

शिवराज पाटील पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, सुहास शिंदे अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, संजय गोवीलकर अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे विजय कावळे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0