
Thane BMC Election Latest News : नऊ प्रभाग समित्यांमधून 1069 अर्जांचे वाटप; लोकमान्य-सावरकर नगरमध्ये सर्वाधिक उत्साह, तर मुंब्र्यात अल्प प्रतिसाद
ठाणे | ठाणे महापालिका निवडणुकीसाठी Thane BMC Election उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) वाटपाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून पहिल्याच दिवशी राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष इच्छुकांनी प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. दिवसभरात शहरातील नऊ प्रभाग समिती कार्यालयांमधून एकूण 1069 अर्जांचे वाटप करण्यात आले. यामध्ये लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत सर्वाधिक अर्जांची विक्री झाली, तर मुंब्रा प्रभाग समितीत सर्वात कमी अर्ज नेले गेले. Thane Latest News
30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पालिकेच्या निवडणूक विभागाने अर्ज देणे आणि स्वीकारणे सुरू केले आहे. 25 आणि 28 डिसेंबरची सार्वजनिक सुट्टी वगळता 30 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवारांना अर्जासोबतच शपथपत्राचे नमुने, कागदपत्रांची यादी आणि निवडणूक नियमावलीची माहितीपुस्तिका दिली जात आहे.
कुठे किती अर्जांचे वाटप?
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभागनिहाय अर्जांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
लोकमान्य-सावरकर नगर: 177 अर्ज (सर्वात जास्त)
माजिवडा-मानपाडा: 157 अर्ज
कळवा: 121 अर्ज
नौपाडा-कोपरी: 113 अर्ज
वर्तकनगर: 103 अर्ज
वागळे इस्टेट: 102 अर्ज
उथळसर: 101 अर्ज
दिवा: 124 अर्ज (दोन गटात विभागलेले)
मुंब्रा: 71 अर्ज (सर्वात कमी)
उमेदवारांसाठी विशेष माहितीपुस्तिका
निवडणूक विभागाने उमेदवारांसाठी एक व्यापक माहितीपुस्तिका तयार केली आहे. यामध्ये निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा, आचारसंहितेचे नियम, प्रभागांचे नकाशे आणि आरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. तसेच मतपत्रिकेवर नाव छापण्याचा नमुना आणि पक्षाच्या उमेदवारांसाठी आवश्यक असणारी जोडपत्रेही अर्जासोबत पुरवली जात आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये वाढती गर्दी पाहता, पालिकेने मदत कक्षांची स्थापना केली असून संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. अर्जांच्या विक्रमी वाटपामुळे आगामी निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.



