Thane ACB Trap News : शहापूरमध्ये एसीबीचा मोठा दणका! 2 लाख 10 हजारांची लाच घेताना वनअधिकारी जाळ्यात; वनरक्षक फरार

Thane Shahpur ACB Trap News : मालवाहू ट्रकच्या वाहतुकीसाठी मागितली होती लाच; खर्डी-वाडा रोडवर ‘एसीबी’ने रचला यशस्वी सापळा
शहापूर/ठाणे | ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी वनपरिमंडळ कार्यालयांतर्गत असलेल्या ‘काष्टी राउंड’मधून मालवाहू ट्रकची विनाअडथळा वाहतूक करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वनअधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. परिमंडळ वनअधिकारी भगवान जयराम भोईर (वय 57) यांना 2 लाख 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणातील दुसरा आरोपी वनरक्षक नितेश राठोड फरार आहे. Thane ACB Latest News
नेमकी घटना काय?
तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे एकूण सहा मालवाहू ट्रक आहेत. हे ट्रक काष्टी राउंडमधील वनविभागाच्या क्षेत्रातून वाहतूक करण्यासाठी वनअधिकारी भगवान भोईर आणि वनरक्षक नितेश राठोड यांनी प्रत्येक ट्रकचे 75 हजार याप्रमाणे सहा ट्रकचे एकूण 4 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे धाव घेतली.
तडजोड आणि सापळा
एसीबीने 5 जानेवारी 2026 रोजी तक्रारीची पडताळणी केली असता, दोन्ही लोकसेवकांनी तडजोडअंती प्रति ट्रक 35 हजार रुपये याप्रमाणे सहा ट्रकचे एकूण 2 लाख 10 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार 9 जानेवारी 2026 रोजी खर्डी-वाडा रोडवरील चंदन पार्कसमोर, बागेचा पाडा येथे एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे भगवान भोईर यांनी तक्रारदाराकडून 2 लाख 10 हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले.
वनरक्षकाचा शोध सुरू
या कारवाईदरम्यान परिमंडळ वनअधिकारी भगवान भोईर यांना अटक करण्यात आली असली, तरी या कटात सामील असलेला वनरक्षक नितेश हुकुमचंद राठोड हा फरार झाला आहे. एसीबीचे पथक त्याचा कसून शोध घेत आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.


