Thailand Fake Job Alert : थायलंडमध्ये नोकरीचे आमिष, म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरी! मिरा-भाईंदर पोलिसांच्या प्रयत्नाने 7 भारतीयांची सुटका

Mira Bhayandar Fake Job News : फेसबुक कंपनीत 80 हजारांच्या पगाराचे आमिष दाखवून केली मानवी तस्करी; 4 आरोपींना अटक, म्यानमार आर्मीच्या मदतीने पिडीत मायदेशी परत
मिरा-भाईंदर | परदेशात उच्च पगाराच्या नोकरीचे स्वप्न दाखवून भारतीय तरुणांना सायबर गुलामगिरीच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीचा मिरा-भाईंदर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. Mira Bhayandar Fake Job News म्यानमारमधील ‘के.के. पार्क’ सारख्या धोकादायक भागात सायबर गुन्हे करण्यासाठी डांबून ठेवलेल्या 7 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये मिरा-भाईंदरमधील 4 आणि इतर 3 अशा एकूण 7 जणांचा समावेश आहे.
नेमकी काय आहे घटना?
नयानगर, मिरा रोड येथील सय्यद इरतीझा हुसैन आणि अम्मार लकडावाला या दोन मित्रांना त्यांच्या ओळखीच्या आसिफ खान उर्फ नेपाळी आणि अदनान शेख यांनी थायलंडमध्ये फेसबुक कंपनीत 80 हजार रुपये पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. जुलै ते सप्टेंबर 2025 दरम्यान त्यांना थायलंडमार्गे अवैधरीत्या म्यानमारमध्ये पाठवण्यात आले. तिथे पोहोचल्यावर त्यांना सायबर फसवणुकीच्या कामात जुंपण्यात आले.
म्यानमारमधील ‘टॉर्चर’ आणि खंडणी
पिडीत तरुणांनी सायबर फसवणुकीचे काम करण्यास नकार दिला असता, त्यांना म्यानमारमधील स्टिव्ह अण्णा आणि लिओ नावाच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केली. तिथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रत्येकी 6 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली आणि आतापर्यंत मिरा-भाईंदर, सुरत व विशाखापट्टणम येथून 4 आरोपींना अटक केली.
अशी झाली आंतरराष्ट्रीय सुटका मोहीम
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने पिडीतांचे आयपी ॲड्रेस, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट माहिती मिळवून त्यांचा अचूक ठावठिकाणा शोधला. ही माहिती इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटर (I4C) द्वारे म्यानमारमधील भारतीय दूतावासाला देण्यात आली. याच दरम्यान म्यानमार आर्मीने के.के. पार्कवर छापा टाकला, ज्यात या 7 भारतीयांची ओळख पटवून त्यांना सुखरूप मायदेशी पाठवण्यात आले.



