Thailand Breaking News : थायलंडमध्ये भीषण अपघात! धावत्या रेल्वेवर कोसळली क्रेन; 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Thailand Accident News : हायस्पीड रेल्वे लाईनचे काम सुरू असताना घडली दुर्घटना; क्रेन कोसळताच डब्याने पेट घेतला आणि रेल्वे रुळावरून घसरली
ANI | थायलंडमधील नाखोन रतचासिमा प्रांतात आज सकाळच्या सुमारास काळाने घाला घातला. शिखिओ जिल्ह्यात हायस्पीड रेल्वे लाईनचे बांधकाम सुरू असताना एक मोठी क्रेन अचानक रेल्वेच्या डब्यावर कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, क्रेन पडल्याबरोबर रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागली आणि रेल्वे रुळावरून खाली घसरली.
बँकॉकपासून 230 किमी अंतरावर दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी बँकॉकपासून सुमारे 230 किमी अंतरावर ही घटना घडली. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, तिथे नवीन हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रेल्वे जात असतानाच क्रेनचे नियंत्रण सुटले आणि ती थेट प्रवाशांनी भरलेल्या डब्यावर आदळली.
आगीत होरपळून मृत्यू
क्रेन कोसळल्यामुळे झालेल्या जोरदार आघाताने रेल्वेच्या डब्यात स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाळा भडकल्या. डब्यात अडकलेल्या 22 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 30 हून अधिक जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
मदतकार्य युद्धपातळीवर
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. जळालेल्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम तासनतास सुरू होते. क्रेनचा वजनदार भाग डब्यावर पडल्याने बचाव कार्यात सुरुवातीला अनेक अडथळे आले. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, रेल्वे मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.



