Thackeray News : मुंबईत ठाकरेंचे ‘ऑपरेशन रेस्क्यू’ यशस्वी! नगरसेविका सरिता म्हस्के परतल्या; मध्यरात्री 2.30 ला मिलिंद नार्वेकरांकडे हजेरी अन् चर्चांना पूर्णविराम

•फोडाफोडीच्या चर्चेला बसला लगाम; 65 नगरसेवकांचा आकडा राहिला अबाधित; आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची घेणार भेट
मुंबई l मुंबई महानगरपालिकेत सत्तेच्या समीकरणांसाठी सुरू असलेल्या संघर्षात बुधवारी मोठा पेच निर्माण झाला होता. प्रभाग क्रमांक 157 मधून विजयी झालेल्या शिवसेना (ठाकरे) गटाच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या अचानक गायब झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्या शिंदे गट किंवा भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली असतानाच, मध्यरात्री 2.30 च्या सुमारास त्यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी हजेरी लावत घरवापसी केली आहे. या सुखद धक्क्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ पुन्हा 65 वर स्थिर झाले असून पक्षाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दिवसभराचा हायव्होल्टेज ड्रामा बुधवारी जेव्हा ठाकरे गटाचे नगरसेवक कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी गेले, तेव्हा सरिता म्हस्के यांच्या अनुपस्थितीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याच वेळी गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली, पण म्हस्के यांच्याशी संपर्क होत नसल्याने ठाकरे गटाचे संख्याबळ 64 वर आल्याचे मानले जात होते. भाजप आणि शिंदे गटाकडून नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, म्हस्के यांचे गायब होणे ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र, नेत्यांनी वारंवार “त्या आमच्या संपर्कात आहेत” असा दावा केला, जो मध्यरात्री अखेर खरा ठरला.
मिलिंद नार्वेकरांची मध्यस्थी आणि ‘मातोश्री’वर रवानगी पक्षाचे संकटमोचक मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर डॉ. सरिता म्हस्के यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर, आज त्या नार्वेकरांसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर जाणार आहेत. या भेटीनंतर त्यांची कोकण भवन येथे स्वतंत्रपणे गट नोंदणी केली जाणार आहे. या घडामोडीमुळे विरोधकांच्या ‘लोटस ऑपरेशन’ला तूर्तास खीळ बसल्याचे बोलले जात आहे.
सत्तेचे रंजक गणित मुंबई महापालिकेत 227 जागांपैकी भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे, तर ठाकरे गट 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महापौरपदासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची भूमिका निर्णायक आहे. अशा परिस्थितीत एकेका नगरसेवकाचे महत्त्व वाढले असून, सरिता म्हस्के यांच्या परतण्यामुळे महापालिकेत ठाकरे गट अधिक मजबुतीने उभा ठाकला आहे. आता सर्वांचे लक्ष आज सकाळी 11 वाजता निघणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.



