
Thackeray Latest News : 20 वर्षांनंतर राज-उद्धव एकाच व्यासपीठावर; मुंबई तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना संयुक्त मुलाखतीतून दिला इशारा
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ऐतिहासिक क्षणाची जनता गेल्या दोन दशकांपासून वाट पाहत होती, तो क्षण अखेर उजाडला आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर, काल त्यांची पहिली संयुक्त मुलाखत पार पडली. “आम्ही केवळ दोन भाऊ म्हणून नव्हे, तर महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत,” असा खणखणीत नारा दोन्ही नेत्यांनी यावेळी दिला.
20 वर्षांचा वनवास संपला
प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या महामुलाखतीत, 20 वर्षांनंतर दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर बसलेले पाहायला मिळाले. “हा दिवस उजाडण्यासाठी 20 वर्षे का लागली?” या राऊतांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “काही गोष्टी का घडल्या, हे आता मागे सोडून दिले पाहिजे. आज हा आमच्या वैयक्तिक अस्तित्वाचा विषय नसून मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. महाराष्ट्र अशा वळणावर उभा आहे जिथे ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती आहे.”
मुंबई तोडण्याच्या कारस्थानावर प्रहार
राज ठाकरेंनी केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुंबईच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. “उत्तरेतून दररोज 56 गाड्या भरून लोक महाराष्ट्रात येत आहेत. मुंबईचा महापौर ‘उत्तर भारतीय’ करू, अशी भाषा वापरली जात आहे. हे केवळ रोजीरोटीसाठी नाही, तर स्वतःचे मतदारसंघ बनवण्यासाठी सुरू असलेला खटाटोप आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी मुंबई तोडण्याचे जे प्रयत्न झाले होते, तेच चित्र आजही दिसत आहे,” असा दावा राज यांनी केला.
मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी अत्यंत भावनिक साद घातली. ते म्हणाले, “आम्ही दोन भाऊ एकत्र आलो हा भावनिक मुद्दा असला तरी, त्यामागचा मूळ उद्देश मराठी माणसाला एकत्र आणणे हा आहे. जर आपण आपापसात वेगळ्या चुली मांडल्या, तर महाराष्ट्र तोडण्याची स्वप्ने पाहणारे आपली पोळी भाजून घेतील. महाराष्ट्र वाचवण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन ‘मराठी’ म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे.”
MMR रिजनचे रक्षण हेच ध्येय
मुंबई, ठाणे आणि संपूर्ण एमएमआर (MMR) रिजनचे रक्षण करण्यासाठी सर्व मतभेद बाजूला सारून ही युती झाली असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. “जर आज आम्ही एकजुटीने सामना केला नाही, तर इतिहास आणि महाराष्ट्र आम्हाला कधीच माफ करणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले.



