Thackeray Group : मुंबई मनपात पुन्हा भगवा फडकवण्याची ‘ठाकरे’ मोहीम तेजीत!
Thackeray Group On BMC On Election : उपनेत्यांना विभागनिहाय जबाबदाऱ्या; संघटनात्मक हालचालींना वेग,निवडणूकपूर्व मोर्चेबांधणीने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य
मुंबई | मुंबई महानगरपालिकेवर Mumbai BMC पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काही महिन्यांत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी ठाकरे गटाने आताच संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.
मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्रतिष्ठेचा गड! तब्बल 25 वर्षांपासून या संस्थेवर सेनेचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी पक्षाकडून रणनीती आखली जात असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षातील प्रमुख उपनेत्यांना विशिष्ट विधानसभा मतदारसंघांवर जबाबदारी सोपवून मैदानात उतरवले जात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. यात अमोल कीर्तीकर (दहिसर- मागाठाणे), उद्धव कदम (चारकोप- मालाड), विश्वासराव नेरूरकर (वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम), रवींद्र मिर्लेकर (विलेपार्ले- वांद्रे), नितीन नांदगावकर (मुलुंड- विक्रोळी), सचिन अहिर (मलबार हिल- मुंबादेवी) गुरुनाथ खोत (चांदिवली, कलीना, कुर्ला),सुबोध आचार्य (घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द), मनोज जमसूतकर (अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा ), अरुण दूधवडकर (धारावी, माहीम, वडाळा),अशोक धात्रक (वरळी, दादर, शिवडी ),विलास पोतनीस (दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व) आदींचा समावेश आहे.
या जबाबदाऱ्या केवळ निवडणुकीपुरत्या नसून, शाखा पातळीवरील संघटनबांधणी, जनसंपर्क, आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक उपनेत्याला तीन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर मोठे दायित्व आले आहे.


