मुंबई

Thackeray Family : ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चाची हाक

Raj Thackeray And Uddhav Thackeray On Hindi Language : त्रिभाषा सूत्राच्या’ नावाखाली जबरदस्तीचा विरोध; सरकारला ताकद दाखवणार

मुंबई | महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात आता दोन्ही ठाकरे बंधू Thackeray आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे दोघेही 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान दरम्यान मोर्चा काढणार आहेत.

या निर्णयामागे कोणताही राजकीय अजेंडा नाही, तर मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढा आहे, असं स्पष्ट करत खासदार संजय राऊत यांनी संयुक्त आंदोलनाची घोषणा केली.

संजय राऊत यांनी सांगितलं की, “त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे ओझं त्यांना पेलवणार नाही. भाषातज्ज्ञांचंही मत आहे की ही सक्ती शिक्षणावर प्रतिकूल परिणाम करू शकते. विशेष म्हणजे गुजरातसारख्या राज्यांना यामधून वगळण्यात आलं आहे, मात्र महाराष्ट्रावर जबरदस्ती केली जात आहे.”

राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मोर्चा जाहीर केला होता, तर उद्धव ठाकरे यांनी 7 जुलैच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. परंतु, राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क करून एकत्रितपणे आंदोलन करण्याचा प्रस्ताव मांडला.आषाढी एकादशीचा दिवस असल्याने 6 जुलै हा दिवस सोयीचा नसल्याचं राऊत यांनी सांगितल्यावर, अखेर दोघांनी 5 जुलै ही सामायिक तारीख ठरवली.

हा मोर्चा कोणत्याही पक्षविरोधी अजेंड्यासाठी नसून, मराठी भाषेच्या हक्कासाठी आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे, असं दोन्ही गटांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सरकारला एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठी जनतेने या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

vivek

Recent Posts