मुंबई

Thackeray Brother’s : 18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू!तृतीय भाषेच्या निर्णयावर यशस्वी लढा; सरकार माघारी, ठाकरे मंचावर ‘विजयी मेळावा’

स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या आघाडीचा संकेत?

मुंबई | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तृतीय भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे बंधूंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा निर्णायक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने अखेर आपला निर्णय मागे घेतला असून, या विजयाच्या निमित्ताने आज ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले.

मराठी जनतेच्या दबावामुळे हा निर्णय मागे घ्यावा लागल्याचा दावा करत ठाकरे बंधूंनी “विजयी मेळावा” आयोजित केला आहे. हा मेळावा केवळ विजयानंद साजरा करणारा नसून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणांचा प्रारंभ करणारा ठरू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

कार्यक्रमाची सुरुवात बँडद्वारे सादर करण्यात आलेल्या “महाराष्ट्र राज्य गीत” ने झाली. उपस्थित सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली. संपूर्ण वातावरणात मराठी अस्मितेचा अभिमान दरवळत होता.

मेळाव्याच्या आधी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या व्हीआयपी रूममध्ये दाखल झाले आणि दोघांमध्ये काही मिनिटे संवाद झाला. व्यासपीठावर केवळ दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या – एक राजसत्तेचे आणि दुसरी विरोधी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ठाकरे बंधूंसाठी. उपस्थितांमध्ये या दृश्याचे खास औत्सुक्य होते.

या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेतेही उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आणि इतर काही महत्त्वाचे नेते या मेळाव्याला हजर होते. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी नव्या आघाडीच्या भूमिकेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

vivek

Recent Posts