मुंबई

Thackeray Brothers : शिवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा शिवाजी पार्कवरून? उद्धव ठाकरे करणार राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचे उद्घाटन

•स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; गेल्या दोन महिन्यांतील ही सातवी भेट!

मुंबई :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन पक्षांची युती आता जवळपास निश्चित मानली जात आहे. याचे सर्वात मोठे संकेत मिळाले आहेत ते म्हणजे, मनसेच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव सोहळ्याचे उद्घाटन यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत!

सातवी भेट आणि थेट दीपोत्सव!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने आज (14 ऑक्टोबर) प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे निवेदन दिले. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत दोन्ही ठाकरे बंधूंमधील जवळीक वाढली असून, विविध मुद्द्यांवर (जसे की, शाळेतील तिसरी भाषा मराठा असावी) एकत्र येत त्यांनी सात ते आठ वेळा भेट घेतली आहे. यामध्ये ‘मातोश्री’ आणि ‘शिवतीर्थ’वरील बंद दाराआडच्या दोन महत्त्वपूर्ण चर्चांचाही समावेश आहे.

मनसेच्या दीपोत्सव 2025 च्या अधिकृत पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव प्रमुख उद्घाटक म्हणून छापल्याने राजकीय वर्तुळात अनेक भुवया उंचावल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट केवळ कौटुंबिक नसून, एका मोठ्या राजकीय समीकरणाची अधिकृत सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

दिवाळीत ‘राजकीय बॉम्ब’ फुटणार?

राजकीय जाणकार आणि दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व्यक्त करत असलेल्या अंदाजानुसार, शिवसेना आणि मनसे एकत्र येणार हे आता केवळ औपचारिकता राहिली आहे. युतीची औपचारिक घोषणा आणि जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची प्रतीक्षा आहे.

शिवाजी पार्क हे दोन्ही पक्षांसाठी अत्यंत भावनिक ठिकाण आहे. याच मैदानातून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली होती. त्यामुळे, दिवाळीच्या या खास सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर आल्यावर थेट युतीची घोषणा करून राजकीय ‘दिवाळी धमाका’ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0