क्रीडा
Trending

Team India : विश्वविजेता भारत! टीम इंडियाने रचला इतिहास; सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर कोरले नाव

Team India Win T 20 World Cup : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिरंगा फडकला; न्यूझीलंडचा धुव्वा उडवत सूर्यकुमारच्या पलटणने राखले जेतेपद, पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

IND win T-20 World Cup-2026 :- भारतीय पुरुष क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकून सुवर्ण इतिहास रचला आहे. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. सव्वा लाख चाहत्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या जल्लोषात टीम इंडियाने विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मिळवलेले जेतेपद सूर्यकुमार यादवच्या ब्रिगेडने 2026 मध्येही कायम राखून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

मैदानावर धावांचा डोंगर आणि गोलंदाजांचा कहर

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. अभिषेक शर्मा, इशान किशन आणि संजू सॅमसन या त्रिकुटाने वादळी अर्धशतके झळकावत भारताला 255 धावांच्या ऐतिहासिक धावसंख्येवर नेऊन ठेवले. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांचा निभाव लागला नाही. अखेर लॉकी फर्ग्युसनचा झेल तिलक वर्माने टिपताच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आणि न्यूझीलंडचा डाव अवघ्या 159 धावांत आटोपला.

पंतप्रधान मोदींकडून “असाधारण कौशल्याचे” कौतुक

भारतीय संघाच्या या देदिप्यमान विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘X’ वर पोस्ट करत आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “चॅम्पियन्स! भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय तुमचे असाधारण कौशल्य आणि दृढनिश्चय दर्शवतो. संपूर्ण स्पर्धेत संघाने दाखवलेले धैर्य अभिमानास्पद आहे. या विजयाने प्रत्येक भारतीयाचे हृदय आनंदाने भरून आले आहे.”

राहुल गांधी आणि अमित शाह यांच्याकडूनही शुभेच्छांचा वर्षाव

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विजयाचे विशेष श्रेय संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांना दिले. “पुन्हा एकदा चॅम्पियन्स! घरच्या मैदानावर ट्रॉफी राखल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. विशेषतः सॅमसन आणि बुमराह यांच्या कामगिरीने हा क्षण अविस्मरणीय केला आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

तर, प्रत्यक्ष स्टेडियमवर उपस्थित असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीम इंडियाला सलाम केला. “काय हा शानदार विजय! तुमच्या असामान्य कामगिरीने देशाला सन्मान मिळवून दिला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी ही कामगिरी आहे,” असे शाह यांनी नमूद केले.

नव्या विक्रमांची नोंद

आजवर क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही संघाला सलग दोन टी-20 विश्वचषक जिंकता आले नव्हते, तो विक्रम आता भारताच्या नावावर झाला आहे. तसेच, मायदेशात खेळताना जेतेपद मिळवणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. या विजयामुळे संपूर्ण देशात दिवाळीसारखे वातावरण असून गल्लोगल्लीत फटाके फोडून आणि तिरंगा फडकवून भारतीय संघाचा गौरव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0