Team India : टीम इंडियाला टेन्शन! यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल; ‘फूड पॉयझनिंग’मुळे 2 किलो वजन घटले

Yashasvi Jaiswal : पुण्यातील हॉटेलमधील जेवण बेतले जिवावर; विजय हजारे ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
मुंबई | भारतीय क्रिकेटचा उगवता तारा यशस्वी जयस्वाल याला भीषण अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई आणि राजस्थान दरम्यानच्या ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ सामन्यादरम्यान जयस्वालच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला हा साधा त्रास वाटत असला, तरी वैद्यकीय तपासणीत त्याला तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस (पोट आणि आतड्यांची जळजळ) झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुण्यातील जेवण पडले महागात मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका हॉटेलमध्ये जेवल्यामुळे जयस्वालला हा त्रास सुरू झाला. पोटात तीव्र कळा येत असल्यामुळे त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र, या आजारपणामुळे गेल्या दोन दिवसांत त्याचे दोन किलोपेक्षा जास्त वजन कमी झाले असून तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे.
डॉक्टरांनी दिला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला यशस्वी जयस्वालला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो मुंबईत परतला आहे. मात्र, त्याची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला पुढील 7 ते 10 दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या काळात त्याला जड शारीरिक श्रम किंवा क्रिकेटच्या मैदानावर उतरता येणार नाही.
विजय हजारे ट्रॉफीवर अनिश्चिततेचे सावट मुंबईचा संघ 24 डिसेंबरपासून सिक्कीमविरुद्धच्या सामन्याने विजय हजारे ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मुंबईसाठी सलामीला येणार होती. मात्र, जयस्वालच्या प्रकृतीमुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता आहे. रोहित आणि यशस्वी या जोडीला मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.



