Team India Comes Home : वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजय रथवरून राजकारण
•Team India Comes Home मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम असा वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाचा विजय रथ निघणार आहे परंतु आता या विजय्रतावरून राज्यात चांगलेच राजकारण पेटले आहे
मुंबई :- राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे त्यादरम्यान टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ हा भारतात दाखल झाला आहे. सकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नाश्ता आणि चर्चा केल्यानंतर भारतीय संघाचे स्वागत आता मुंबईत होणार आहे क्रिकेटची मायानगरी म्हणून मुंबईची ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियमवर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यादरम्यान मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम यादरम्यान भारतीय संघाचा ओपन बस मधून रोड शो होणार आहे अनेक क्रिकेट प्रेमी भारतीय संघाला पाहण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मरीन लाइन्स ते वानखेडे स्टेडियमवर असणार आहे. परंतु जो विजयरथ आला आहे तो गुजरात मधून आल्याचा आरोप करत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
मुंबईत होणाऱ्या मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणून एकप्रकारे महाराष्ट्राचा अपमान करण्यात आला आहे, हे सरकार गुजरातधार्जिणे झाले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच रोहित पवार व आदित्य ठाकरे यांनी देखील जोरदार टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही गुजरातमधून बस आणण्याबाबत नाराजी व्यक्त केली. भारतीय संघाच्या खेळाडूंना देशाने ताकद दिली, त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. पण मुंबईत भारतीय संघ येत आहे आणि जर का मिरवणूक काढली जात असेल तर मुंबईची बेस्ट बस यासाठी वापरायला हवी होती. बेस्ट बस आणि मुंबई अशी एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे बेस्टची बस वापरली गेली असती, तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बीसीसीआयने गुजरातहून बस आणलीच आहे, पण त्यांनी बेस्टच्या बसची निवड करायला हवी होती, असेही रोहित पवार म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयच्या वतीने वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी यासासाठी आज वानखेडे स्टेडियममध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली आहे. स्टेडियममध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर प्रवेश मिळेल.