Marathi Morcha : हिंदी सक्ती आदेश रद्द! ठाकरे बंधूंच्या मोर्चापूर्वीच सरकारचा यू-टर्न

Sanjay Raut On Marathi Morcha : संजय राऊतांचा टोला – “ठाकरे हा ब्रँड आहे”; राज ठाकरे म्हणाले, ‘लढाई अजून संपलेली नाही’
मुंबई : राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्याने निर्माण झालेल्या राजकीय गदारोळावर अखेर पडदा टाकण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन संबंधित सरकारी आदेश रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयाने ठाकरे बंधूंनी 5 जुलै रोजी पुकारलेल्या सर्वपक्षीय मोर्च्याच्या आधीच वातावरण बदलले आहे. Marathi Morcha Latest News
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा मोर्चा राज्यभरातील मराठी जनतेसाठी एकजूट आणि अस्मितेचे प्रतीक मानला जात होता. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेचे आवाहन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी आज सकाळी सरकारच्या हिंदी सक्ती आदेशाची होळी करत संताप व्यक्त केला. परंतु संध्याकाळच्या निर्णयाने हा वाद फिलहाल शांत झाला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर पोस्ट केली
“हिंदी सक्तीचा आदेश रद्द! हा मराठी एकजुटीचा विजय आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने सरकारने धसका घेतला. 5 जुलैचा मोर्चा आता निघणार नाही, पण ‘ठाकरे’ हा ब्रँड आहे!”




राज ठाकरेंची पोस्ट
“इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील 2 जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये… त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा. मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.”


