NIA News : मुंबई विमानतळावर ‘ISIS’ प्रकरणातील दोन फरार दहशतवाद्यांना एनआयएच्या जाळ्यात

2023 मधील पुण्यातील स्लीपर मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई,इंडोनेशियातून परतत असताना दोघांना अटक; एनआयएने 3 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते
मुंबई :- राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने 2023 मधील पुण्यातील ‘ISIS स्लीपर मॉड्यूल’ प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी आहेत.
दोघेही इंडोनेशियातील जकार्तामध्ये लपून बसले होते आणि भारतात परतत असताना इमिग्रेशन ब्युरोने त्यांना मुंबई विमानतळाच्या T2 टर्मिनलवर पकडले. नंतर NIA टीमने त्यांना ताब्यात घेतले आणि अटक केली.
बॉम्ब तयार करणे, प्रशिक्षण आणि चाचणी यामध्ये सहभाग:
NIA च्या तपासानुसार, या दोघांनी पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके (IED) तयार करण्याचे कारस्थान रचले होते. 2022-2023 दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर घेतले आणि एका स्फोटकाची नियंत्रित चाचणीही घेतली होती. या कारवायांमुळे देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला होता.
या प्रकरणात एकूण 10 आरोपी आहेत, ज्यांपैकी उर्वरित आठ जण आधीच अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत. सर्व आरोपींवर UAPA, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.
NIA ने यापूर्वी या दोघांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दोघांविरुद्ध विशेष NIA न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटही जारी केले होते. त्यांच्या अटकेमुळे देशातील दहशतवादी स्लीपर सेल्सविरोधातील लढ्याला मोठे यश मिळाले आहे.



