
Pune Breaking News : ‘राज्यपाल फालतू’, ‘न्यायव्यवस्था दबावाखाली’ या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे बार कौन्सिलची मोठी कारवाई
पुणे :- पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी (3 नोव्हेंबर) त्यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
अॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे निर्देश दिले आहेत. असीम सरोदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेली काही विधाने वादग्रस्त ठरली. तक्रारदाराने सादर केलेल्या व्हिडिओ क्लिप्स आणि ट्रान्सक्रिप्टमध्ये असीम सरोदे स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत की, “राज्यपाल फालतू आहेत” व “न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे” आणि निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात. या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला असून, नागरिकांमध्ये न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याचे बार कौन्सिलच्या समितीने नमूद केले.
वकील हा “Officer of the Court” असल्याने त्याने न्यायसंस्था आणि संविधानिक पदे यांचा आदर राखणे ही नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे, असे समितीने म्हटले. तक्रारदाराने माफी मागण्याची संधी देऊनही त्यांनी ती नाकारल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
अॅडव्होकेट असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत. त्यांची सनद रद्द झाल्यामुळे त्यांना या तीन महिन्यांच्या कालावधीत न्यायालयात यु्क्तिवाद करता येणार नाही.



