
Pune Breaking News : अश्लील बोलण्यावरून वाद, जिम ट्रेनरने स्वीकारला गुन्हा
पुणे :- चऱ्होली येथे एका प्रोटीन पावडरच्या दुकानात झालेल्या वादानंतर दोन जिम ट्रेनरनी एका तरुणाची लोखंडी रॉड आणि पहारीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी घडलेल्या या घटनेनंतर आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली, ज्यामुळे दिघी पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Pune Breaking News
लल्ला ऊर्फ गोपीनाथ वरपे (वय 22) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर असलेले प्रांजल तावरे आणि यश पाटोळे यांचे चऱ्होली येथे प्रोटीन पावडरचे दुकान आहे. आज दुपारी लल्ला वरपे दुकानात आला आणि तो प्रांजल तावरे याला अश्लील भाषेत बोलू लागला. यामुळे दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. लल्लाने शिवीगाळ सुरू केल्याने संतप्त झालेल्या प्रांजल आणि यश पाटोळे यांनी त्याला पहार आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या दोन्ही आरोपींनी थेट दिघी पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, लल्लाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. आरोपी आणि मयत व्यक्ती एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.



