Laxman Hake : गेवराईत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक; आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांशी वाद

Laxman Hake Latest News : छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमने-सामने; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न
बीड :- बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हाके यांच्या गाडीवर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या गाडीची पुढील काच फुटली.
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देणारे बॅनर लावल्यावरून हा वाद सुरू होता. या वादातूनच लक्ष्मण हाके यांनी आज याच चौकात येऊन विजयसिंह पंडितांना आव्हान दिले होते. हाके चौकात पोहोचताच दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही क्षणांतच परिस्थिती चिघळली आणि चप्पल फेक, दगडफेक तसेच मारहाणीचा प्रयत्नही झाला.
या गोंधळामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढून बीडच्या दिशेने रवाना केले.
या घटनेवर आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “लक्ष्मण हाके हे बीड जिल्ह्यात येऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” काही दिवसांपूर्वी हाके यांनी आपल्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन प्रतिक्रिया दिली होती, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिल्याचे पंडित यांनी सांगितले. “जरांगे पाटील यांना समर्थन दिल्याने समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


