मुंबई

बाबासाहेबांना ‘गार्ड ऑफ ऑनर’! – चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, लाखो अनुयायांची पहाटेपासून अलोट गर्दी

•69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय मानवंदना; राज्यपाल देव भारतींकडून अभिवादन; मुंबईत ‘मिनी सिटी’ सज्ज, अनुयायांसाठी पालिका आणि पोलिसांची मोठी व्यवस्था

मुंबई/दादर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज, शनिवार,6 डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या लाखो अनुयायांनी अलोट गर्दी केली आहे. पहाटेपासूनच महामानवाला मानवंदना देण्यासाठी अनुयायांची रिघ लागली असून, सकाळी 7.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. यानंतर चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. राज्यपाल देव भारती यांनीही सकाळी चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन केले.

अनुयायांसाठी पालिका सज्ज

4 डिसेंबरपासूनच मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत दाखल झाले असल्याने, त्यांच्या गैरसोयी टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) आणि अन्य ठिकाणी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
निवारा आणि सुविधा: शिवाजी पार्क येथे 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) निवासी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे, जिथे 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. 30 हजार चौरस मीटरच्या पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादन केले आहे.
स्वच्छता व पाणी: परिसराची स्वच्छता राखण्यासाठी 527 कामगार तैनात आहेत. दर्शन रांगा आणि मार्गांवर 150 फिरती शौचालये, महिलांसाठी पिंक टॉयलेट्स तसेच नळ व शॉवर सुविधेसह 284 तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 16 टँकर आणि 254 नळ उपलब्ध आहेत.
आरोग्य आणि सुरक्षा: वैद्यकीय सेवा देण्यासाठी 585 तज्ज्ञ मनुष्यबळ कार्यरत आहे. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स आणि बॅग स्कॅनर्ससह नियंत्रण कक्ष उभारले आहेत. अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका आणि दादर चौपाटी येथे बोट आदी व्यवस्था तैनात आहेत.

डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी अभिवादन

चैत्यभूमीवर अभिवादनासाठी दाखल झालेले अनुयायी निळ्या टोप्या आणि पांढरे शुभ्र कपडे परिधान करून लांबच लांब रांगा लावत आहेत. अनेक अनुयायी केवळ चैत्यभूमीवरच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह, वडाळा येथील कॉलेज, परळमधील बीआयटी चाळ आणि फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांनाही भेट देत आहेत. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट’चे आयोजन केले आहे. चैत्यभूमी परिसरात पुस्तकांचे आणि छायाचित्रांचे स्टॉल्स मोठ्या संख्येने लागले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0