
Mumbai Political Latest News : ‘फडणवीसांच्या हातात काहीच नाही, त्यांना फक्त दिल्लीच्या ऑर्डर पाळाव्या लागतात’; राज ठाकरेंचे थेट विधान
मुंबई | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत व महेश मांजरेकर यांना दिलेल्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. या मुलाखतीत दोन्ही भावांनी मुंबईची अस्मिता, मराठी माणसाची संपत्ती आणि केंद्र सरकारचे कथित ‘धोरण’ यावरून भाजपवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
“दिल्लीच्या दोघांच्या मनात वेगळेच”
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली. ते म्हणाले, “फडणवीस काय बोलतात त्याला महत्त्व नाही, कारण त्यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीत बसलेल्या दोघांच्या (मोदी-शहा) मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. ‘वरून’ आदेश आला की ही जमीन अदानीला द्यायची, तर फडणवीसांना फक्त सही करावी लागते. ते फक्त ‘ओबे द ऑर्डर’ (आदेशाचे पालन) करू शकतात.”
मुंबईची संस्कृती मारण्याचा प्रयत्न – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवर भाष्य केले. “मुंबई कोणी महाराष्ट्रापासून कागदोपत्री तोडू शकत नाही, पण तिची संस्कृती मारली जात आहे. कोणीही येतो आणि सांगतो या भागाची भाषा गुजराती आहे. आमच्यावर हिंदीची सक्ती केली जात आहे. मुंबईची लक्ष्मी (संपत्ती) कोणाकडे गेली? मराठी माणूस आज मुंबईबाहेर गेला असून संपत्ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात एकवटली आहे,” अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
विमानतळ आणि अदानींबाबत राज ठाकरेंचा मोठा दावा राज ठाकरे यांनी मुंबईच्या जमिनींबाबत एक गंभीर आरोप केला. ते म्हणाले:
“मुंबईतील हक्काच्या विमानतळावरील सर्व कार्गो, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल उड्डाणे हळूहळू नवी मुंबई विमानतळावर हलवली जातील.”
“मुंबई विमानतळाचा परिसर (जो अदानींकडे आहे) 50 शिवाजी पार्क मैदानांइतका मोठा आहे.”
“एकदा उड्डाणे तिकडे हलवली की मुंबई विमानतळाची ही मोकळी झालेली जागा विकून तिथून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा हा ‘स्ट्रॅटेजिक’ प्लॅन आहे.”
‘भाजपलाही एक्सपायरी डेट आहे’
मुलाखतीच्या उत्तरार्धात दोन्ही नेत्यांनी भाजपच्या सत्तेवर निशाणा साधला. “जगातील कोणत्याही सत्तेला अंत असतो, तसाच भाजपलाही ‘एक्सपायरी डेट’ आहे,” असा टोला ठाकरे बंधूंनी लगावला. “महाराष्ट्राच्या हितासाठी आता मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि आम्ही ते करून दाखवले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


