Pune Crime News : पुणे जिल्ह्यात 19 लाखांची गावठी दारू जप्त

•तीन ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई; चार आरोपींना अटक
पुणे :- पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 19 लाख 71 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 3,320 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि 5 वाहनांचा समावेश आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 आणि 4 चे निरीक्षक देवदत्त पोटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मार्केट यार्ड (पुणे), शेलपिंपळगाव (ता. खेड) आणि आंबी (ता. मावळ) अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून ही कारवाई करण्यात आली.
निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. यात दुय्यम निरीक्षक डी. एस. सूर्यवंशी, वाय. एम. चव्हाण, ए. डी. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर साबळे, संजय साठे यांच्यासह अनेक जवान आणि महिला जवान सहभागी होते.
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्याच्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात महसुलाचे नुकसान होत असते. याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक देवदत्त पोटे यांनी केले आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.



