मुंबईठाणे
Trending

Sharad Pawar : निवडणुकीत कामाऐवजी ‘पैसा’ आणि ‘निधी’ चालतोय! शरद पवारांची महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका

Sharad Pawar On Mahayuti : शेतकरी कर्जवसुली स्थगिती हा तात्पुरता दिलासा; “नुकसानभरपाईसाठी भरीव मदत आवश्यक होती”

मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांनी महायुतीच्या (भाजप-शिंदे गट) नेत्यांकडून सुरू असलेल्या ‘निधी’च्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडून आल्यास विकास निधी देऊ, असे थेट आवाहन करणाऱ्या नेत्यांना पवारांनी खडे बोल सुनावले आहेत.

‘पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ’

“या निवडणुकीत कामावर नाही, तर थेट पैसे आणि निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती द्यायचे, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे,” अशा शब्दांत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठिकठिकाणी गट निर्माण झाले असून, एका पक्षातील गट दुसऱ्या पक्षासोबत जात आहेत. अनेक ठिकाणी ही गटबाजी पहिल्यांदाच दिसून येत आहे. “याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीत एकवाक्यता नाही आणि पैसे, निधीवर मतं मागितली जात आहेत, जी चांगली गोष्ट नाही,” असे म्हणत त्यांनी महायुतीच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

“पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हवा तो योग्य निकाल मतदार घेतील. आमच्यासारख्यांनी असे प्रयत्न यापूर्वी केले नाहीत आणि आताही करणार नाहीत,” असे सूचक विधानही त्यांनी केले.

शेतकऱ्यांना अपुऱ्या मदतीवर नाराजी

यावेळी शरद पवार यांनी मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाष्य केले. राज्य सरकारने शेतकरी कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. मात्र, पवारांनी ही मदत पुरेशी नसल्याचे स्पष्ट मत मांडले.
“कर्जवसुलीला स्थगिती देणे हा केवळ तात्पुरता दिलासा आहे. ज्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यांना सरकारने काही रक्कम द्यायला हवी होती. तसेच, काही व्याज माफ करून कर्जाचे हप्ते पाडून दिले असते, तर शेतकऱ्यांना अधिक मदत झाली असती,” असे पवार म्हणाले. सध्याची मदत अपुरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0