Sharad Pawar : 40 वर्षांची साथ संपली! शरद पवारांचे निष्ठावान सहकारी अरुण गुजराती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत

Arun Gujarathi Joined Ajit Pawar Party : माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांचा कार्यकर्त्यांसाठी भावनिक निर्णय; चोपड्यात अजित पवार गटाला मोठी बळकटी
मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतरांचा हंगाम पुन्हा सुरू झाला असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांचे चार दशकांपासूनचे जिवलग सहकारी आणि ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांनी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज (मंगळवार) संध्याकाळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
40 वर्षांची साथ सोडताना भावनिक: अरुण गुजराती हे शरद पवार यांचे निष्ठावंत शिलेदार मानले जात होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाशी जोडले होते. आज सकाळी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या राजकीय प्रवासाचा शेवट केला.
यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली
“शरद पवार साहेबांसोबत आनंदाचा काळ गेला. ज्यांनी मला मोठं केलं ते शरद पवार आणि ज्यांनी मला पुढे आणलं ते माझे कार्यकर्ते. दोघांच्या मध्ये मी सँडविच झालो होतो. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असे गुजराती म्हणाले.
कार्यकर्त्यांचा दबाव निर्णायक ठरला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटांत विभागल्यानंतर चोपड्यात अरुण गुजराती यांच्या समर्थकांमध्ये मोठी फूट पडली होती. “अजित पवार यांच्यासोबत गेले तर तुमच्यासोबत राहू, नाहीतर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे,” असा कार्यकर्त्यांचा दबाव आल्यानंतर गुजराती यांना अखेर हा कठीण निर्णय घ्यावा लागला.
राजकीय परिणाम
अरुण गुजराती यांनी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले आहे. चोपडा मतदारसंघात त्यांची संघटनात्मक पकड मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक स्तरावर, विशेषतः चोपडा परिसरात मोठी बळकटी मिळणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने अजित पवार गटासाठी हा एक ‘प्रतिष्ठेचा’ राजकीय प्रवेश मानला जात आहे.
या प्रवेशानंतर चोपडा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


