मुंबई

160 जागा मिळवून देणाऱ्या’ गौप्यस्फोटावरून नवा वाद; शरद पवार यांच्या चौकशीची भाजपची मागणी

•भाजप आमदार प्रशांत बंब यांचा थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा इशारा

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपूरमधील पत्रकार परिषदेत केलेल्या ‘160 जागा निवडून आणून देतो’ या गौप्यस्फोटावरून आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार प्रशांत बंब यांनी थेट पवार यांच्या या विधानाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी ते लवकरच निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

पवार यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यांनी सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांना भेटून 288 पैकी 160 जागांवर मतांची फेरफार करून निवडून आणण्याची हमी दिली होती. मात्र, त्यावेळी निवडणूक आयोगावर विश्वास असल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पवार यांनी म्हटले होते.

भाजप आमदार प्रशांत बंब यांनी याच विधानाचा आधार घेत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे असे लोक आल्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले. मग शरद पवार यांनी असे का केले नाही?” असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, “ज्याप्रमाणे ईडीच्या चौकशीला ते स्वतःहून सामोरे गेले, त्याचप्रमाणे या उच्चस्तरीय चौकशीलाही त्यांनी सामोरे जावे,” अशी मागणी बंब यांनी केली आहे.

बंब यांनी केवळ शरद पवारच नव्हे, तर राहुल गांधी यांच्या कार्यालयाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे या प्रकरणाला आता नवीन वळण लागले असून, निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0