
Maharashtra Rain Update : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; रस्ते वाहतुकीसाठी बंद
मुंबई | राज्यात मान्सूनने जोरदार आगमन केलं असून, कोकण किनारपट्टी, घाटमाथ्याचे जिल्हे आणि मध्य महाराष्ट्र याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, पूरस्थिती टाळण्यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Maharashtra Rain Update
सध्या गोदावरीसह अनेक नद्यांना पूर आला असून, धरणांमध्येही जलसाठा झपाट्याने वाढत आहे. कोकणातील खेड आणि दापोली भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा अनुभव येईल, मात्र दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेल्या 24 तासांत पावसाची नोंद
रत्नागिरी: 41.7 मिमी
ठाणे व पालघर: 41.6 मिमी
रायगड: 40.1 मिमी
मुंबई उपनगर: 31.7 मिमी
पुणे, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये 23 आणि 24 जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. पुणे घाट परिसरात शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.21 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली आदी मराठवाड्यात पावसाची शक्यता असली, तरी 22 जूननंतर पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हं आहेत.


