मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: 17 वर्षांनंतर आज लागणार निकाल; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींवर लक्ष

Malegaon Bomb Blast Latest Update : एनआयएची आरोपींना फाशीची मागणी; देशाचे लक्ष मुंबईतील विशेष न्यायालयाकडे
मुंबई :- आज 29 सप्टेंबर 2025 बरोबर 17 वर्षांपूर्वी याच दिवशी मालेगाव शहर एका भीषण बॉम्बस्फोटाने हादरले होते. Malegaon Bomb Blast भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. आता तब्बल 17 वर्षांनंतर, या प्रकरणाचा बहुप्रतीक्षित निकाल आज मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयात लागणार आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
या प्रकरणात भाजप नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) या सर्व सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, कारण त्यांच्या मते, मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण पसरवणे आणि जातीय तणाव निर्माण करणे हेच यामागील कारस्थान होते.
प्रकरणाचा तपास आणि कायदेशीर प्रवास:
29 सप्टेंबर 2008 रोजी रमजान महिन्यात मशिदीजवळ ठेवलेल्या दुचाकीच्या स्फोटात हे हत्याकांड घडले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) केला. एटीएसने जानेवारी 2008 मध्ये फरिदाबाद, भोपाळ, आणि नाशिक येथे कटाची योजना आखण्यात आल्याचा दावा केला होता. त्यांच्या तपासानुसार, स्फोटात RDX चा वापर करण्यात आला होता, जो जम्मू-काश्मीरमधील पोस्टिंगदरम्यान मिळवून सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब बनवण्यात आला. त्यानंतर चतुर्वेदी आणि रामचंद्र कालासंग्रा यांनी बॉम्ब दुचाकीवर बसवून गर्दीच्या ठिकाणी पार्क केला होता. रामचंद्र कलासंग्रा आणि संदीप डांगे हे अजूनही फरार आहेत. एटीएसने 14 नोव्हेंबरपर्यंत एकूण 11 जणांना अटक केली होती आणि त्यांच्यावर ‘मोक्का’ (MCOCA) लावला होता.
2011 साली या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे हस्तांतरित करण्यात आला. एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर काही जबाब नव्याने नोंदवले, ज्यात काही साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली होती. मोक्का हटवल्यानंतर मोक्का अंतर्गत घेतलेल्या जबाबांची कायदेशीर किंमत कमी झाली होती. सुरुवातीला एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात पुरेसे पुरावे नसल्याचे सांगत त्यांना आरोपींच्या यादीतून वगळण्याची मागणी केली होती, परंतु विशेष एनआयए कोर्टाने ती मागणी फेटाळून लावली होती.
अखेर, सात आरोपींवर आरोप निश्चिती झाल्यानंतर 2018 मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. जवळपास 17 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर, 19 एप्रिल रोजी सुनावणी पूर्ण झाली आणि न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आजच्या दिवशी, 31 जुलै रोजी, या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याने पीडित कुटुंबीय आणि संपूर्ण देशाचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.


