Kalyan – Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत भाजप-शिंदेसेनेची राजकीय कुरघोडी शिगेला! निष्ठावान नेत्यांची अदलाबदल

•’नाईक कार्ड’नंतर आता दीपेश म्हात्रेंचा भाजप प्रवेश; शिंदेंकडून लगेच कडव्या विरोधकाला विधानसभा अध्यक्षपद देऊन थेट पलटवार
कल्याण-डोंबिवली :- ठाणे विभागाची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणाऱ्या भाजपने आता शिंदे गटाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान उभे करण्यास सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आणि डोंबिवलीचे महत्त्वाचे नेते दीपेश म्हात्रे यांना भाजपने आपल्या गळाला लावले आहे. यामुळे ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतही शिंदेसेनेला कडवे आव्हान उभे राहील, या दिशेने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
भाजपच्या खेळीला शिंदे गटाचे प्रत्युत्तर
दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तात्काळ प्रति-चाल खेळली. त्यांनी कल्याण पूर्वचे भाजपचे कडवे विरोधक महेश गायकवाड यांना मुंबईतील निवासस्थानी बोलावून घेत त्यांच्याकडे पक्षाच्या विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या दोन्ही पक्षांमध्ये महापालिका निवडणुकांपूर्वी स्थानिक पातळीवर कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.

दीपेश म्हात्रेंची राजकीय वळणे
दीपेश म्हात्रे हे एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरीत होते आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. मात्र, डोंबिवलीची जागा भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे असल्याने महायुतीच्या गणितात त्यांना उमेदवारी मिळणे कठीण होते. त्यामुळे ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे परतले आणि त्यांनी जिल्हाप्रमुख पदही भूषवले. विशेष म्हणजे, दीपेश यांचा कल शिंदेसेनेच्या दिशेने असेल अशी चर्चा असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी त्यांना भाजपकडे वळवून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यापुढेच आव्हान उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महेश गायकवाड यांना महत्त्वाचे पद
दुसरीकडे, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड हे कडवे भाजप विरोधक मानले जातात. भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश यांच्यावर केलेल्या गोळीबाराचे प्रकरण राज्यात गाजले होते. दीपेश यांचा भाजप प्रवेश नक्की होताच शिंदे यांनी महेश गायकवाड यांना पक्षाचे विधानसभा अध्यक्षपद देऊ केले.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत स्थानिक नेतृत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदेसेनेत सुरू असलेल्या या ‘निष्ठावानांच्या अदलाबदली’मुळे महायुतीत निवडणुकीच्या तोंडावर तणाव वाढल्याचे चित्र आहे. युती झाली तरी निवडणूकपूर्व वाटाघाटींमध्ये भाजप उजवा ठरावा, अशी ही रणनिती असून शिंदे गटाशी दोन हात करावे लागलेच तर दीपेश यांचा पुरेपूर वापर करता येईल अशी आखणी भाजपने केली आहे.


