Thane Road Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Bhiwandi Thane Road Accident News :नारपोली पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी (ठाणे) : भरधाव वेगाने आलेल्या मोटारीच्या धडकेत हेमल पटेल (वय 32) या दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना वळपाडा परिसरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी Bhiwandi Narpoli Police Station मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेमल पटेल हे भिवंडीतील अंजुरफाटा परिसरात कुटुंबासोबत राहत होते. ते मुंबईच्या पवई परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते दुचाकीवरून कामावर निघाले होते. मात्र वळपाडा परिसरात आल्यानंतर एक भरधाव मोटार त्यांच्या दुचाकीवर आदळली. या अपघातात हेमल रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांना सूचित केले. जखमी हेमल यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना आयजीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर हेमल पटेल यांच्या काकांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी मोटारचालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या योग्य कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.


