पुण्याच्या ‘ड्रग पार्टी’ प्रकरणात नवा ट्विस्ट: रोहिणी खडसे वकिलीच्या भूमिकेत, ‘अडकवल्याचा’ युक्तिवाद!

Pune Rev Party Latest Update : पोलिसांकडून आणखी पोलीस कोठडीची मागणी; राहुल नावाच्या नव्या व्यक्तीचा शोध सुरू
पुणे :- पुण्यातील खराडी येथे 27 जुलै रोजी उघडकीस आलेल्या कथित ‘ड्रग पार्टी’ प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्टीत अटक झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश आहे. आज पोलीस कोठडी संपल्याने सर्व सात आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष म्हणजे, रोहिणी खडसे स्वतः वकिलीचा कोट घालून पतीच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयात उपस्थित होत्या.
पोलिसांकडून कोठडी वाढवण्याची मागणी, नव्या व्यक्तीचा शोध
पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात माहिती दिली की, तपासात ‘राहुल’ नावाच्या एका नव्या व्यक्तीची माहिती मिळाली आहे, जो हुक्का भरण्याचे काम करत होता. त्याचा शोध घ्यायचा आहे. अंमली पदार्थ कोठून आणले, याबाबत आरोपी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, त्यामुळे त्यांची अधिक चौकशी करणे आवश्यक आहे. पोलिसांनी सातपैकी अटक असलेल्या दोन महिला आरोपींची पोलीस कोठडी सध्या गरजेची नसल्याचे सांगत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. मात्र, पाच पुरुष आरोपींकडे आणखी चौकशी करायची असल्याने त्यांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आली असून, त्याबाबतही अधिक तपास करण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यावतीने त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद केला. ते म्हणाले की, “दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ देऊन प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात आले आहे. ईशा सिंग हिच्या पर्समध्ये सिगारेटच्या रिकाम्या पाकिटात कोकेन सापडले आहे. ईशा सिंगला प्लांट (जाणूनबुजून तिथे ठेवल्याचे) करण्यात आले होते.”
वकील ठोंबरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “पोलिस आता त्या दोन महिला आरोपींना न्यायालयीन कोठडीची मागणी करत आहेत आणि प्रांजल खेवलकर यांची मात्र पोलीस कोठडी मागत आहेत. प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही आणि त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेले देखील नाहीत. अंमली पदार्थांचा फॉरेन्सिक रिपोर्ट हेतुपुरस्सर लवकर येत नाहीये.”



